Ratnagiri Rain : अवकाळीमुळे आंबा-काजूचे ५२ हजार हेक्‍टरवर नुकसान

शासनाच्‍या आदेशानुसार जिल्‍ह्यात पंचनामे पूर्ण; हेक्‍टरी ३ लाखांचे नुकसान, सरकार देणार हेक्‍टरी साडेबावीस हजार रुपये
Ratnagiri Rain
अवकाळीमुळे आंबा-काजूचे ५२ हजार हेक्‍टरवर नुकसान
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनामार्फत यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यात २८ हजार ९७५ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांचे ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू बागांना या अवकाळीचा जबर तडाखा बसल्याचे समोर आले आहे. शेतकरी हेक्टरी ३ लाखांचे आंबा उत्पन्‍न घेतो, मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. त्यात भरपाईला २ हेक्टरची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे.

यंदाच्या आंबा आणि काजू हंगामात अवकाळीच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लहरी वातावरणामुळे वारंवार फळधारणा होऊन ते गळुन गेले. त्यामुळे फक्त २० ते ३० टक्केच आंबा आणि काजू पीक शेतकऱ्यांच्या हाताला लागले. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. गेले दोन महिने जिल्हा कृषी विभागामार्फत ही प्रक्रिया सुरू होती ती काल पूर्ण झाली. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पथकाने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली, तर काही ठिकाणी ग्रामपंचायतींमधून खातेदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे २८ हजार ९७५ शेतकरी व बागायतदार संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण आंब्याचे ३१ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र, तर २० हजार १२ हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे. शासनाच्या निकषानुसार प्राथमिकदृष्ट्या ५२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या एकूण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन आता बाधितांना प्रत्यक्षात किती निधी देणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. सध्याच्या शासकीय नियमांनुसार, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर २२ हजार ५०० रुपये भरपाई दिली जाते, तसेच ही मदत केवळ २ हेक्टरच्या मर्यादे पर्यंत आहे. दुसरीकडे, बागायतदारांच्या मते आंबा पिकातून त्यांना हेक्टरी सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्‍न मिळते. त्यामुळे झालेले नुकसान आणि मिळणारी शासकीय मदत यात मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्‍नाचा विचार केला तर हे नुकसान सुमारे १५६ कोटीच्या दरम्यान जाते. त्यामुळे शासनाकडून आता प्रत्यक्ष किती भारपाई मिळणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे. शासनाने ही भरपाईची रक्कम वाढवून द्यावी आणि २ हेक्टरची जाचक मर्यादाही शिथिल करावी, अशी आग्रही मागणी आता जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आंबा आणि काजू पिकाच्या नुकसान भारपाईचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्राथमिकदृष्टया ५२ हजार हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल आम्ही दोन दिवसात शासनाला सादर करणार असल्‍याची माहिती जिल्‍हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news