

चिपळूण : लँडस्लाईडचे मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर १५० ते २०० मीटरवर असलेला डोंगर सरकला असून, तो रस्त्यावर आला आहे. या घटनेची नेमकी कारणे शोधून त्याचा सविस्तर पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. गाळ काढल्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर येथील पुराची तीव्रता कमी झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
परशुराम घाटाची आणि चिपळूण येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, घाटातील परिस्थिती स्वतः पाहणी केली असून अधिकार्यांशीही चर्चा केली आहे. वेगळे तंत्रज्ञान वापरले आहे.
चिपळुणात आढावा बैठक
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वन विभागाच्या सभागृहात मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई तहसीलदार प्रवीण लोकरे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. सामंत म्हणाले, चार दिवसांत प्रचंड पाऊस झाला असून, १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट गाठले आहे. पूर परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही स्तरावर कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे सूचित केले. चिपळूणमधील वाशिष्ठी, खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वरमधील शास्त्री नद्यांमधील गाळ काढल्याने पूर नियंत्रित झाल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
लोकप्रतिनिधींनी जनजागृती वाढवावी
संभाव्य परिस्थितीचा सामना करताना नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवकांनी स्वतः भागात सक्रिय राहून नागरिकांमध्ये सतर्कता आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.