Ratnagiri News : नियमभंग; वाहनचालकांना वर्षात सव्‍वातीन कोटी दंड

आरटीओच्या धडक मोहिमेमुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले
Ratnagiri News
नियमभंग; वाहनचालकांना वर्षात सव्‍वातीन कोटी दंड
Published on
Updated on

​रत्नागिरी : रस्त्यांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) वायुवेग पथक कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर सुसाट धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने वर्षभरात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

गेल्या वर्षभरात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) तब्बल ५ हजार ८१४ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ कोटी ३३ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आणि १८ लाख ४४ हजार रुपयांचा कर असा एकूण साडेतीन कोटींपेक्षा जास्त रकमेचा महसूल वसूल करण्यात आला आहे.

आरटीओच्या या धडक मोहिमेमुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ​या संपूर्ण कारवाईत सर्वाधिक दंडाचा फटका मालवाहू ट्रक, टिपर आणि ट्रेलर यांना बसला आहे. क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे (ओव्हरलोडिंग) किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय या कारवाईतून येतो. पथकाने अशा ३५५ ओव्हरलोड वाहनांना पकडून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

​मालवाहू वाहनांसोबतच प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवरही कडक पावले उचलण्यात आली. नियम मोडणाऱ्या ४२५ प्रवासी बसेस आणि ७२ खाजगी वाहनांकडून २६.८८ लाख रुपये दंड व २२.७२ लाख रुपये कर वसूल करण्यात आला, तर ७७ रिक्षाचालकांकडून ३ लाख ९ हजार रुपयांची दंडात्मक वसुली झाली. चिमुरड्यांची वाहतूक करणाऱ्या शाळा प्रशासनालाही आरटीओने दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५५ स्कूल बसेसवर कारवाई करत ३ लाख ८१ हजार रुपये दंड आणि १२ हजार रुपये कर वसूल करण्यात आला आहे.

​रस्त्यावरील सुरक्षेचा विचार करता गुन्हेनिहाय कारवाईचा आकडाही मोठा आहे. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणारे १४३०, सीटबेल्ट न लावणारे २१५, क्षमतेपेक्षा जास्त वेगाने गाड्या पळवणारे (ओव्हरस्पीड) १३२२ आणि ट्रिपल सीट जाणारे ६३ चालक आरटीओच्या जाळ्यात अडकले. तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलणारे २३८ जण, इन्शुरन्स नसलेले १०९७, आरटीओची परवानगी न घेता गाड्यांमध्ये बदल करणारे ४८ जण, रात्रीच्या वेळी धोकादायक ठरणाऱ्या रिफ्लेक्टरशिवाय धावणारी ४९४ वाहने, लायसन्स नसलेले ६०४ चालक, फिटनेस सर्टिफिकेट संपलेली ११७६ वाहने आणि पीयुसी नसताना प्रदूषण पसरवणाऱ्या १२८० वाहनांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

रस्त्यांवर शिस्त लागावी आणि निष्पाप लोकांचे अपघात टळावेत, यासाठी ही तपासणी मोहीम यापुढेही अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांनी दिला आहे. तसेच सर्व वाहतूकदार आणि चालकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news