Ratnagiri Accident : 'देव तारी त्याला कोण मारी!' राजापुरात ५० फुटांवरून कार दरीत कोसळताना थोडक्यात बचावली

राजापूर पांगरेत थरारक अपघात; ७ भाविक थोडक्यात बचावले
Ratnagiri Accident News
Ratnagiri Accident News
Published on
Updated on

राजापूर : तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी घडलेल्या एका थरारक घटनेत सात भाविकांचे प्राण अक्षरशः थोडक्यात बचावले. पुणे येथून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चारचाकी गाडी तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना दाट रानवेली आणि झुडुपांमध्ये अडकून राहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय या घटनेत आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी समाधीस्थळालाही भेट दिली. सायंकाळी ५ च्या सुमारास पांगरे पुलालगत उभी केलेली चारचाकी सुरू करताना हँडब्रेक व्यवस्थित ओढलेला नसल्याने वाहन अचानक मागे सरकू लागले.

वाहनाच्या मागील बाजूस सुमारे ५० फूट खोल वाहळाची दरी असून त्यामध्ये मोठमोठे दगड आहेत. गाडी घसरत घसरत दरीच्या दिशेने सरकली आणि जवळपास ७५ टक्के भाग दरीत झुकला. मात्र, सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या दाट झुडपांमध्ये व रानवेलींमध्ये वाहन अडकून राहिले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेच्या वेळी वाहनात सात जण होते. प्रसंगावधान राखत सर्वांनी पुढील दरवाजातून बाहेर पडून सुरक्षितता साधली. बाहेर आल्यानंतर समोर दिसणारे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. वाहनाने एक जरी पलटी घेतली असती तर ते थेट दरीत कोसळून भीषण अपघात घडण्याची शक्यता होती.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दरीच्या काठावर अडकलेल्या वाहनामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रानवेली आणि झुडपांनीच सात जणांचे प्राण वाचवल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मोठा अनर्थ टळल्याने भाविकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news