Ratnagiri News : शाळा सुरू, पण पुस्तकांचा पत्ता नाही!

रत्नागिरी जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा; हजारो विद्यार्थ्यांचा पुस्तकांविनाच अभ्यास
Ratnagiri News
Ratnagiri News
Published on
Updated on

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे ८० हजार पाठ्यपुस्तके मिळणे बाकी असून विशेषतः सहावीच्या मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवायच शिक्षण घ्यावे लागत आहे. शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाचा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात अत्यल्प प्रमाणात पुस्तके उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविली जातात. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने नव्या पुस्तकांची आवश्यकता वाढली आहे. ही पुस्तके मे महिन्यातच उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा तुटवडा कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे.

सहावीच्या मराठी माध्यमातील बालभारती, सेमी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांची पुस्तके अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. उर्दू माध्यमातील तिसरी, चौथी आणि सहावीच्या अनेक विषयांची स्थितीही अशीच आहे. त्यामुळे शिक्षकांना पाठ्यपुस्तकांशिवाय अध्यापन करावे लागत असून विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ९८२ पुस्तके रत्नागिरी तालुक्यासाठी येणे बाकी आहेत. त्यापाठोपाठ चिपळूण (१२,४५६), संगमेश्वर (८,५६०), दापोली (८,४७५), राजापूर (८,३३८) आणि खेड (८,२९४) तालुक्यांचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पुस्तकांची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.पालक व विद्यार्थी यांनी शिक्षण विभागाने तातडीने पाठपुरावा करून उर्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत उर्वरित पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होईल, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचा पुस्तकांविनाच सुरू असलेला अभ्यास हा शिक्षण व्यवस्थेतील नियोजनाच्या त्रुटींचा नमुना ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news