Ratnagiri News : पाणी जपा, टंचाई टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यातील काही शहरांकडे केवळ २५ ते ३० दिवसांचा पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश
Ratnagiri News
रत्नागिरी : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी.
Published on
Updated on

रत्नागिरी : मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि जिल्ह्यात निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. जिल्ह्यातील काही शहरांकडे केवळ पुढील २५ ते ३० दिवस पुरेल एवढाच पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाने टंचाई नियोजनासाठी कंबर कसली आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत जिंदल यांनी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. "रत्नागिरी हा निसर्गसंपन्न जिल्हा असला तरी पाऊस लांबल्याने काही भागांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारून प्रशासनाला सहकार्य करावे," असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत धरणांतील उपलब्ध साठा, विहिरी, विंधन विहिरी आणि अन्य जलस्रोतांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नगरपालिका, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीला आपल्या कार्यक्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करून पाणी उपलब्धता, टँकरची गरज आणि पर्यायी व्यवस्था याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, पाणीटंचाईच्या काळात रिसॉर्टस्‌ आणि होमस्टेतील जलतरण तलावांसाठी होणारा बिगर-अन्न विषयक पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सार्वजनिक जलस्रोतांच्या ५०० मीटर परिसरातील सर्व पाणीस्रोतांची माहिती जलआराखड्यात समाविष्ट करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिक व कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांचा स्वतंत्र विचार करून त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

टंचाईग्रस्त गावांतील पाणीपुरवठ्याचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देशही देण्यात आले. मान्सूनची प्रतीक्षा सुरू असताना प्रशासनाने पाणी वापरावर नियंत्रण व उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला असून, नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही परिस्थिती हाताळणे कठीण असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news