

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. तुरळ-हारेकरवाडी येथे फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यानंतर मेघी गावकरवाडी येथे विहिरीत नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये वन विभागाने गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.
मौजे तुरळ-हारेकरवाडी येथून माखजनकडे जाणाऱ्या स्थानिक रस्त्यालगत खैराच्या झाडाला लावलेल्या फासकीत एक बिबट्या अडकून मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिस पाटील यांनी शुक्रवारी सकाळी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान बिबट्या फासकीत अडकल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने मृत बिबट्याला फासकीतून बाहेर काढून संबंधित साहित्य जप्त केले. शवविच्छेदनानंतर सर्व अवयव सुरक्षित असल्याची खात्री करून मृत बिबट्याची विल्हेवाट लावली. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.