

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गव्यांची अर्थान रान रेड्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंतेची बाब ठरत आहे. गव्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, नवीन झाडांच्या लागवडीचे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अचानक रस्त्यावर येणारा गव्यांचा कळप, तरी कधी डोंगरात अचानक पुढ्यात येणारी गव्यांची झुंबड यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
माखजन पंचक्रोशीत आंबव पोंक्षे, सरंद, पेढांबे, कासे आदी गावांमध्ये तर कोसुंब, कसबा, धामापूर, साखरपा, मार्लेश्वर आदी भागात गवा रड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अचानक रस्त्यावर कळप आल्याने दुचाकीस्वार पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. संगमेश्वर तालुक्यात अनेक गावात शेतकऱ्यांच्या पावटा, कडवा, मटकी, कुळीत, चवळी आदीच्या शेतीची नासधूस केली आहे. शिवाय या कडधान्यांच्या शेतात हे गवे रेडे चरल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही.
या गव्यांकडून भात शेतीची देखील नासधूस होत असल्याने घरापासून, वस्तीपासून दूर असणारी भात शेती करणे सोडून दिले आहे. तालुक्यातील भात शेती पिकाचे क्षेत्र कमी होणे हेदेखील चिंतेचीच बाब आहे. शिवाय आठ ते दहा वर्षे वयापर्यंतची आंबा व काजू लागवड गव्यांकडून नामशेष झाल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला शे-दोनशे आंबा व काजू लागवड केल्यावर त्याभोंवती तारेचे कुंपण करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा गव्यांच्या नासधुशीत गमावल्या आहेत. याची दाद कुणाकडे मागावी हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.
संगमेश्वर तालुक्यातील गव्यांना पकडून वन विभागाने अभयारण्यात सोडावे अशी मागणी केली जात आहे. भविष्यात गव्यांची संख्या वाढत गेली तर हळू हळू बंद होत असलेली भात शेती पूर्णतः बंद होऊ शकते. आंबा व काजूच्या बागा शिल्लक राहिल्या नाहीत किंवा मेहनतीने तयार् केलेल्या बागा नामशेष झाल्या तर ग्रामस्थ शहराकडे स्थलांतरित होतील. याचा गांभीर्याने विचार करून वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडू होत आहे.