

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत खेड तालुक्यातील धामणदेवी गावाच्या हद्दीत लोकवस्तीच्या अगदी जवळ रासायनिक टँकर व कंटेनरांची साठवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी आवश्यक परवानगी घेतल्या आहेत का? तसेच सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा व्यवसाय तत्काळ थांबवून या प्रकरणी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
धामणदेवी गावाच्या हद्दीत आणि लोटे औद्योगिक वसाहतीच्या जवळ लोकवस्तीत धोकादायक रासायनिक कंटेनरांची चढ-उतार व साठवणूक सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून जिल्हा परिषद रस्ता व राष्ट्रीय महामार्ग लागून असलेल्या या जागेत धोकादायक रसायनांचा साठा असल्यास दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या साठवणुकीसाठी लोटे किंवा धामणदेवी ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी घेतलेली नाही. तसेच महसूल व संबंधित प्राधिकरणाच्या देखील परवानग्या घेतल्या नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असून, लोटे ग्रामपंचायतीने संबंधितांना पत्र देऊन आवश्यक माहिती मागवली आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन चाळके यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही या संदर्भात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
याबाबत खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, सोमवारपासून या प्रकरणाची प्रत्यक्ष तपासणी व चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित ठिकाणी व्यावसायिकांकडे संपर्क साधला असता केवळ जागा मालकाने एका कंपनीला जागा भाड्याने दिल्याचे येथील उपस्थित कर्मचारी यांनी सांगितले. दरम्यान कोणतीही व्यवसाय परवानगी संबंधित कागदपत्रे देखील सदर कर्मचारी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.