

चिपळूण : तालुक्यातील उमरोली येथील भडवळकरवाडी येथे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्यची वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. मंगळवारी (दि. १७) सकाळी ही घटना उघडकीस आली. सुमारे एक वर्ष वयाच्या मादी काळ्या बिबट्याला कोणतीही इजा न होता विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
उमरोली येथील भडवळकरवाडीमधील विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीच्या विहिरीत काळा बिबट्या पडल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांनी वनरक्षक राहुल गुंठे यांना दिली. माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित विहीर लोकवस्तीपासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर शेतात असून, तिला कठडा किंवा संरक्षक बांधकाम नव्हते. विहिरीत पाणी असून, सुमारे ४० फूट खोल असलेल्या या विहिरीतील एका दगडावर बिबट्याने आश्रय घेतला होता. वन विभागाच्या पथकाने सावधगिरीने पिंजरा विहिरीत सोडला. यावेळी बिबट्याने पिंजऱ्यावर उडी मारली. बचाव पथकाने कौशल्याने पिंजऱ्याची हालचाल नियंत्रित करत बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले.
या बचाव मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कृष्णा इरमले, वनरक्षक राहुल गुंठे, बचाव पथकातील अजय बडदे, अथर्व घाग, वाहनचालक नंदकुमार कदम आणि लिपिक शहेनशहा कलावंत यांनी सहभाग घेतला. मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.