

खेड : राजवेल गावचे माजी सरपंच महामूद दाऊद हमदुले यांच्या गोठ्याला गुरुवार (दि. 18 जून 2026) रोजी भीषण आग लागून मोठी जीवित व वित्तहानी झाली. या दुर्घटनेत 17 जनावरे मृत्युमुखी पडली, तर दोन जनावरे वाचवण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हमदुले यांच्या गोठा क्र. 6, 6अ व 6ब मध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या आगीत 1 गाय, 1 वासरू, 9 म्हशी आणि 6 रेडकू अशा एकूण 17 जनावरांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि दोन जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठा तसेच घराच्या पडवीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या दुर्घटनेत गोठा, घराची पडवी व जनावरांचे मिळून सुमारे 24 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ग्राम महसूल अधिकारी आकाश बोरखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित यंत्रणांकडून आगीच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हमदुले कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.