

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा खरा सामना रंगणार असला तरी निवडणूक रिंगणात 12 बंडखोर अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवून मोठे आव्हान दिल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या शीतल पटेल यानी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीने मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे सर्वाधिक लक्ष लागून राहिले आहे .त्यामुळे मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस आघाडीकडून विधापरिषदेच्या माजी आमदार आणि माजी नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे तर शिंदेसेना महायुतीकडुन श्रुती ताम्हणकर या रिंगणात कायम असतानाच भाजपाच्या माजी उपनगराध्यक्षा शीतल पटेल यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राजापुरात नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती. शितल पटेल यानी बंडखोरी केल्याने महायुतीपुढे मोठे आव्हान उभे झाले होते. पटेल यांची उमेदवारी कुणाची गणिते बिघडवतात त्याचीच जोरदार चर्चा सुरु असताना शीतल पटेल यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सर्वच पक्षानी काहीसा उसासा टाकला आहे. आता या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडुन हुस्नबानू खलिफे, महायुतीकडुन श्रूती ताम्हणकर व अपक्ष म्हणून ज्योती खटावकर हे तीन उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी खरी लढत ही हुस्नबानू खलिफे व श्रुती ताम्हणकर यांच्यातच होणार आहे. हे निश्चित आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचा एक तर नगरसेवक पदाचे सात अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर अनेक उमेदवारांचे काहीसे टेन्शन कमी झाले असले तरी अद्यापही रिंगणात बारा अपक्ष कायम राहिल्याने त्याचा चांगलाच फटका नेमका कुणाला बसेल त्याची गणिते आता राजकीय वर्तुळात मांडली जात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार हि आता काळ्या दगडावरील रेघ बनली आहे. तर दहा प्रभागातील 20 जागांसाठी होणाऱ्या लढती प्रामुख्याने दुरंगी आणि तिरंगी अशा स्वरूपात असणार आहेत. यामध्ये अकरा जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढती होतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण 8 हजार 143 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 4 हजार 219 महिला मतदार तर 3 हजार 924 इतके पुरुष मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1 हजार 60 इतके मतदार हे प्रभाग क्र. 6 मध्ये असून सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्र. 3 मध्ये 596 इतके आहेत. यामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये एकूण 900 मतदार असून 438 पुरूष तर 462 महिला, प्रभाग क्र. 2 मध्ये एकूण 755 मतदार असून 362 पुरुष 393 महिला, प्रभाग क्र. 3 मध्ये सर्वात कमी म्हणजेच एकूण 596 मतदार असून यामध्ये 289 पुरुष तर 307 महिला मतदार आहेत.
प्रभाग क्र. 4 मध्ये एकूण 756 मतदार असून यामध्ये पुरुष 368 तर महिला 388, प्रभाग क्र. 5 मध्ये एकूण 759 मतदार असून यामध्ये 367 पुरुष तर महिला 392 महिला मतदार आहेत. प्रभाग क्र. 6 मध्ये सर्वाधिक एक हजार 60 इतके मतदार असून यामध्ये पुरुष 486, तर 574 महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकूण 926 इतके मतदार असून यामध्ये 443 पुरुष तर 483 महिला मतदारांचा समावेश आहे. प्रथम क्रमांक 8 मध्ये एकूण 683 इतके मतदार असून यात 345 पुरुष तर 338 महिला मतदार आहेत.
प्रभाग क्र. 9 मध्ये एकूण 923 मतदार असून यामध्ये 452 पुरुष व 471 महिला मतदार आहेत. तर प्रभाग क्र. दहामध्ये एकूण 785 मतदार असून यामध्ये 374 पुरुष व 411 महिला मतदारांचा समावेश आहे.आता मतदार राजा कुणाला आपला कौल देतो त्यावरच प्रत्येक उमेदवारांच्या यशाची गणिते ठरणार आहेत. प्रत्येक प्रभागात प्रचाराला यापूर्वीच सुरवात झाली आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेणे यावर भर देण्यात आला आहे.