Ratnagiri News : ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ जामदा धरणग्रस्तांचा एल्गार

साखळी उपोषणाचा तिसरा दिवस
कार्जिडा : येथे साखळी उपोषणास बसलेले जामदा धरणग्रस्त.
कार्जिडा : येथे साखळी उपोषणास बसलेले जामदा धरणग्रस्त.
Published on
Updated on

राजापूर : राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे जामदा धरणग्रस्तांनी उभारलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून “आधी पुनर्वसन, मग धरण” ही ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. विकासाच्या नावाखाली गाव, शेती, घरे आणि उपजीविका उद्ध्वस्त केली जात असताना पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी काजिर्डा येथे भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. जामदा धरण प्रकल्पाची अधिसूचना २००८ मध्ये जाहीर झाली होती. मात्र तब्बल दीड दशक उलटूनही बाधित क्षेत्राचे संपूर्ण सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण झालेली नाही. पुनर्वसन नेमके कुठे होणार, कोणत्या अटींवर होणार, रोजगार, जमीन, घर आणि मूलभूत सुविधांची हमी काय, या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनाकडे नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“आमच्या डोक्यावर विकासाचा बुलडोझर चालवायचा आणि आम्हालाच अंधारात ठेवायचे, हे आम्ही सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पुनर्वसनाची लेखी आणि ठोस हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सक्रे, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विभागप्रमुख विलास नारकर यांच्यासह शिवसैनिकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. शासनाने धरणग्रस्तांच्या भावना समजून घेत न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कोकणात विकासाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी “जमीन, घर, संस्कृती आणि अस्तित्व उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

जामदा धरणग्रस्तांचा हा लढा केवळ पुनर्वसनासाठी नसून न्याय, सन्मान आणि जगण्याच्या हक्कासाठी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.गेल्या चार दिवसांपासून काजिर्डा ग्रामस्थ न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले असून “प्रथम पुनर्वसन, मगच धरणाचे काम” ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, गेली दोन दशके रखडलेल्या जामदा प्रकल्पाचे काम नेमके केव्हा पूर्ण होणार आणि ग्रामस्थांचे प्रश्न केव्हा सुटणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.

काजिर्डा येथे जामदा धरण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी रवींद्र डोळस, कमलाकर कदम, अशोक सक्रे, विलास नारकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news