Teachers Protest : रत्नागिरी जिल्‍हा परिषदेवर प्राथमिक शिक्षकांचा धडक मोर्चा

हजारो शिक्षक सामील; ‘टीईटी, बीएलओचे काम रद्द करा’चा घुमला आवाज, मागण्यांचे निवेदन सादर
Teachers Protest
Teachers Protest
Published on
Updated on

रत्‍नागिरीः ‘शिक्षकांचे बीएलओ काम रद्द करा, टीईटी रद्द करा, जुनी पेंशन लागू करा’ यासह विविध मागण्यांसाठी रत्‍नागिरी जिल्‍हा प्राथमिक शिक्षक समन्‍वय समितीच्‍या वतीने गुरूवारी दुपारी १२ च्‍या सुमारास माळ नाका ते जिल्‍हा परिषदेपर्यंत भव्‍य धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

शिक्षकांच्‍या मोर्चात दोन कि.मी रांगाच रांगा लागल्‍या होत्‍या. शिक्षकांनी जिल्‍हा परिषदेला घेराव घातला होता. मोर्चानंतर जिल्‍हा परिषदेच्‍या सीईओ वैदेही रानडे, जिल्‍हाधिकारी मनुज जिंदल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शिक्षकांच्‍या विविध प्रलंबित प्रश्नासाठी गुरूवारी राज्‍यव्‍यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनातर्गत मुंबईत आझाद मैदानावर धरणे, निदर्शने करण्यात आली. त्‍याच पार्श्वभूमीवर रत्‍नागिरी जिल्‍हा प्राथमिक शिक्षक समन्‍वय समितीचे अध्यक्ष दिलीप देवळेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली माळ नाका ते जिल्‍हा परिषदेपर्यंत भव्‍य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ५ हजारहून अधिक शिक्षक, शिक्षीका उपस्‍थित होत्‍या.

दुपारी बाराच्‍या सुमारास माळ नाकापासून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी विविध मागण्यांचे फलक शिक्षकांनी घेतले होते. आमच्‍या मागण्या मान्‍य झाल्‍याच पाहिजे, कोण म्‍हणतय देत नाही, घेतल्‍याशिवाय राहत नाही, एकच मिशन, जुनी पेन्‍शन हमारे मांगे पुरी करो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, रद्द करा, रद्द करा शिक्षकांना बीएलओचे काम रद्द करा यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माळ नाकापासून सुरू झालेला मोर्चा जिल्‍हा परिषदेच्‍या आवारात संपला. यावेळी उपस्थित शिक्षकानी मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्‍याचा निर्धार केला.

जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन जाहीर करून माळ नाका ते जिल्‍हा परिषदपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो शिक्षक उपस्‍थित राहिल्‍यामुळे मुख्य रस्‍त्‍यांवर वाहतूक विस्‍कळीत झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहनांच्‍या रांगाच रांगा लावल्‍या होत्‍या. शिक्षकांच्या विराट मोर्चाने परिसरत दणदणून गेला होता. यावेळी वाहतूक पोलिस, पोलिसांचा चोख बंदोबस्‍त दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news