

चिपळूण शहर : जिजाऊ योजनेअंतर्गत जिल्ह्यात नवीन एसटी बसेस दाखल झाल्या असतानाही चिपळूण आगाराला नवीन बस न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासह आगार व्यवस्थापकांची भेट घेत संताप व्यक्त करत निवेदन सादर केले.
एसटी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसपैकी दोन बसेस चिपळूण डेपोसाठी देण्यात आल्या होत्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पुन्हा परत मागवून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चिपळूण आगारातील प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या चिपळूण आगारातील अनेक जुन्या बसेसची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसाळ्यात बसमध्ये पाणी गळत असल्याने प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागत आहे. काही बसांच्या खिडक्या तुटलेल्या असून आसनांचीही मोडकळीस आलेली अवस्था आहे. या समस्यांबाबत माजी सभापती शौकत मुकादम व जयंद्रथ खताते यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दरम्यान, चिपळूण डेपोला नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेतल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी दादा साळवी, पांडुरंग माळी, पं. स. सदस्य शरद शिगवण, शौकत माखजनकर, प्रकाश पवार, विकास जोवेकर आदी उपस्थित होते.