

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असून, रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. एअरलाईन्स कंपनीने यासाठी निविदा भरल्या असून, केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाशी प्रवासी वाहतुकीबाबतचा अधिकृत करार लवकरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ना. सामंत म्हणाले की, विमान वाहतूक विभागाचे अधिकारी दीपक कपूर पुढील आठवड्यात रत्नागिरी विमानतळाची पाहणी करणार आहेत. विमानतळावरील कामे वेगाने सुरू असून, पुढील तीन ते चार महिन्यांत येथून प्रवासी विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर यंदा भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क आहे. संभाव्य धोकादायक २१ ठिकाणी सुमारे २६० कोटी रुपयांच्या खर्चातून निवारा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यातील कमी झालेल्या पाणीसाठ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे पाणी रत्नागिरी शहराला उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन स्तरावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामाबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की, पावसाच्या उशिरामुळे पेरण्या लांबल्या आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून दिले असले, तरी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.