

चिपळूण शहर : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गुरुवारी दुपारी १ वाजता गोव्याकडे जाणारा रसायनवाहू टँकर (एमएच-४३-बीपी-८४९४) रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातात चालकाचा टँकरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. क्लिनर किरकोळ जखमी झाला.
अधिक माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीतून मिथेनॉल नावाचे रसायन घेऊन हा टँकर गोव्याकडे निघाला होता. परशुराम घाटात चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने तो पलटी झाला. चालक सनीबल्ला शेरअली खान (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने टँकरमधून उडी मारली. मात्र त्याचा टँकरखाली सापडून जागीच मृत्यू झाला.
मिथेनॉल हे रसायन औषध निर्माण कंपनीकरिता वापरले जाते, अशी माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अपघात घडताच घटनास्थळी विनती कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच लोटे औद्योगिक वसाहत व चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून रसायनाची तीव्रता कमी केली. यावेळी पोलिस बंदोबस्त होता. उलटलेला टँकर सरळ करण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. हा टँकर रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर त्यातील रसायन अन्य टँकरमध्ये सुरक्षितरित्या भरून घेण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघातामुळे गोव्याकडे जाणारी एक लेन सहा तास बंद राहिल्याने घाटातील वाहतूक एका लेनवरून सुरू होती. परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून पाच तास वाहतूक सुरू होती. महामार्गावरील परशुराम घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. चौपदरीकरण झाल्यामुळे वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नसल्याने अपघात वाढत आहेत.