Ratnagiri News : पानवल धरणातून पाणी दिवाळीनंतरच वापरात

जलवाहिनीसाठी पाईप येऊनही काम बंद; पाणी साठवूनही त्‍याचा उपयोग नाही
Ratnagiri News
रत्‍नागिरी : पाईपलाईनसाठी काजरघाटी धारेवर येऊन पडलेले पाईप.
Published on
Updated on

रत्नागिरी : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे दुसरे पानवल धरण पूर्णपणे दुरुस्त झाले असले, तरी धरण ते नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले नसल्याने शहरवासीयांना पाणी दिवाळीनंतरच उपलब्ध होणार आहे.

पानवल धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ५१८ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी ३४० दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त साठा आहे. शहराला सध्या शीळ धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाणीसाठा घटल्याने मे महिन्यापासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ८ जून रोजी झालेल्या पावसामुळे शीळ धरणातील पाणीसाठा ०.४८७ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढल्याने हे नियोजन रद्द करण्यात आले.

दरम्यान, पानवल धरणात गाळ काढणे, वॉल्व बसवणे आणि अन्य तांत्रिक दुरुस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. धरणातील पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक असलेली जलवाहिनी टाकण्याचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. ही जलवाहिनी उभारण्याची जबाबदारी असलेल्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने सुमारे १ कोटी रुपयांचे पाईप खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, नगर परिषदेने यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांची बिले अदा न केल्याने कंपनीसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून पुढील काम रखडल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळ्यापूर्वी ही बिले अदा झाली असती, तर काही प्रमाणात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होऊ शकले असते. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यानंतर सुरू होऊन दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी, पानवल धरणात यंदा साठणारे पाणी शहराच्या वापरासाठी दिवाळीनंतरच उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news