

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोलपंपासमोर दुचाकी व कार यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जियाऊलक रफिक अन्सारी (२७, रा. झारखंड) हा जागीच ठार झाला आहे. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला आहे.
जियाऊलक आपली दुचाकी घेऊन लांजाकडून राजापूरकडे येत असताना पेट्रोलपंपातून अचानक बाहेर पडणाऱ्या कारवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात अन्सारी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलिस व स्थानिकांनी जियाऊलक याला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जियाऊलक हा झारखंड येथील रहिवाशी असून, तो राजापुरात एका बिल्डिंग कंट्रक्शनची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करत होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद केली आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला माहिती देण्यात आली आहे.