Ratnagiri News| अखेर मराठी माध्यमाच्‍या समुपदेशनाला मिळाला मुहूर्त

२३ नोव्‍हेंबर रोजी २०२ शिक्षकांचे होणार समुपदेशन; मराठी शाळांना मंगळवारी मिळणार नवे गुरुजी
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्‍प्‍याची शिक्षक भरती अंतिम टप्‍प्‍यावर आली आहे. मराठी माध्यमाच्‍या २०२ शिक्षकांच्‍या समुपदेशनाला दिवाळीनंतर मुहूर्त मिळाला असून, येत्‍या २३ नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या कै. शामराव पेजे सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत समुपदेशन होणार असून सर्व उमेदवारांनी वेळेत यावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.

समुपदेशनासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, विस्‍तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्‍थित राहणार आहेत.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात १ हजार १७ शिक्षकांची पदे रिक्‍त असून पहिल्‍या टप्‍प्‍यात ४५७ शिक्षकांना नियुक्‍ती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यात गणित, विज्ञान विषयातील मराठीचे २२० उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी दांडी मारली तर २१० उमेदवारांच्‍या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली होती. २५ दिवसानंतर उर्दूच्‍या ८ उमेदवारांचे समुपदेशन होऊन त्‍यांना शाळा देण्यात आल्‍या. दिवाळीपूर्वीच मराठी माध्यमाचे समुपदेशन होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, मुहूर्त हुकले. उमेदवार शिक्षण विभागात हेलपाटे मारत होते, तर काहीजण मोबाईलद्वारे संपर्क साधत होते.

अखेर मराठी माध्यमाच्‍या शिक्षकांच्‍या समुपदेशाला मुहूर्त मिळालेला असून २३ नोव्‍हेंबर रोजी दिवसभरात समुपदेशन होणार आहे. त्‍यामुळे उमेदवारांनी सर्व तयारीनीशी वेळेत यावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्‍या वतीने करण्यात आले. सर्व उमेदवारांना ई-मेलद्वारे पत्र पाठवण्यात आले आहे. उमेदवारांना शाळा देण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी त्‍या उमेदवारांना हजर राहावे लागणार आहे. त्‍यामुळे कमी पटसंख्या, शिक्षक रिक्‍त असलेल्‍या शाळांना आता नवे गुरुजी मिळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.