Ratnagiri News : मंडणगडमध्ये मान्सूनपूर्व कामांचा उरकच नाही!

मान्‍सून तोंडावर आला तरी प्रशासकीय पातळीवर उदासीनता; विकासकामे मंदगतीने सुरू
Ratnagiri News
मंडणगडमध्ये मान्सूनपूर्व कामांचा उरकच नाही!
Published on
Updated on

मंडणगड : मान्सून तोंडावर आला असला तरी मान्सूनपूर्व विविध कामांचा उरक प्रशासनास अद्याप करता आला नाही. एकूणच मंडणगडमधील शासकीय कामकाजाची स्थिती अशी आहे. तालुक्याची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक नुकतीच झाली. मात्र विविध कामे आटोपण्यात प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही होताना दिसत नाही. विकासकामे अद्यापही मंदगतीने सुरू आहेत. मान्सून समोर येऊन ठेपला आहे, पण येथील यंत्रणेतील उदासीनतेत बदल नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील धोकादायक स्थितीतील झाडी हटवणे, रस्त्यालगत गटार व्यवस्था करणे, आडू घालणे, रस्ते, पाणी, वीज आदी सार्वजनिक विकासकामे गतीने उरकणे, शेतीच्या कामांना बियाणे, शेतकऱ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबिरे, धोकादायक स्थितीतील गावांमधील घरांना भूस्खलनच्या शक्यतेने विविध सूचना किंवा अन्यत्र स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, नदीकिनारी भागातील गावांना सूचना आदी कामे यापूर्वी युद्धपातळीवर होत असत. यावर्षी यापैकी हालचाली दिसत नाहीत, विविध शासकीय विकासकामे मंदपणे सुरू आहेत. जरी याबाबतीत आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत तशा सूचना दिल्या असतील तरी त्या जाहीर नाहीत किंवा त्यावर कार्यवाही दिसत नाही. हवामान विभागाच्या वतीने हवामान बदलाचे स्पष्ट इशारे दिले गेले आहेत. मात्र या आघाड्यांवरील मरगळ चिंताजनक आहे.

मंडणगड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मान्सून सक्रिय होऊन सातत्य कायम राहिले तर शहरात या मार्गाच्या कामामुळे दुरवस्था नक्कीच निर्माण होऊ शकते. रस्तेमार्गाच्या या कामात अद्याप गटार व्यवस्था अपूर्ण आहे. याचबरोबर तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजात मान्सूनपूर्व कामांवर कार्यवाही नाही. सुरू असलेल्या विविध विभागांच्या विकास कामांच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी देखरेखीसाठी उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोणाचे नियंत्रणाचा प्रश्नच नसल्याने सबंधित आपल्या मर्जी व वेळेनुसार काम करण्यात व्यस्त असल्याचे बोलके चित्र पाहायला मिळते.

आगामी पावसात रस्तेमार्गाच्या कामांची काय स्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा, असे बोलले जात आहे. म्हाप्रळ चिंचाळी येथे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाचा स्लॅब दोनच दिवसांपूर्वी झाला आहे. त्यामुळे त्यास लागणाऱ्या क्युरिंगचा कालावधी बांधकाम नियमानुसार जर २१ दिवसांचा धरल्यास जूनच्या अखेरपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू करता येणार नाही व नवीन पुलास माती भरावाने तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्यास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. यासाठी विविध आघाड्यांवर मान्सूनपूर्व उपाययोजना करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया मात्र तालुकावासीयांमधून उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news