

चिपळूण : मान्सून अद्याप सक्रिय न झाल्याने चिपळूण व लोटेमधील उद्योजकांवर पाणीबाणीचे संकट ओढवले आहे. पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्पाची वीजनिर्मिती ठप्प झाली असून कोयना वीज प्रकल्पातून सोडण्यात येणारे अवजल आता वाशिष्ठीत येणे बंद झाले आहे. यामुळे उद्योजकांबरोबरच अनेक ग्रामपंचायतींसह चिपळूण शहरावर पाण्याचे संकट ओढवणार आहे.
कोयना धरणाची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून याचा परिणाम चिपळूणसह खेड तालुक्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करून सोडण्यात येणारे अवजल चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. त्यामुळे या पाण्यावर वाशिष्ठी किनार्यालगतच्या ग्रामपंचायती, चिपळूण शहर तसेच औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. मात्र, सद्यस्थितीत कोयनेचे अवजल वाशिष्ठी नदीत येत नसल्याने पाणीबाणीचे संकट ओढवले आहे.
लोटे एमआयडीसी, गाणी-खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी मिळून सुमारे 300 कारखाने या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यातील काही कारखान्यांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. त्यामुळे या उद्योगांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पाण्याचे संकट लक्षात घेऊन काही कारखान्यांनी आपले उत्पादन घटविले आहे. त्याच पद्धतीने हे पाणी अंजनवेल (ता. गुहागर) येथील रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर कंपनीला पुरविण्यात येते. त्यामुळे या पाणी टंचाईचा परिणाम त्यावरही झाला आहे. लवकर पाऊस न झाल्यास एमआयडीसीमधील उद्योग बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात लोटे औद्योगिक वसाहतीअंतर्गत येणार्या काही उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकार्यांकडे पाण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात एमआयडीसीचे अधिकारी किशोर हळदणकर यांनी कोयना धरण व्यवस्थापन व पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला. मात्र, धरणातच पाणी नसल्याने पाणी सोडणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.