Ratnagiri News : देखभालीअभावी मोरी ठरली धोकादायक

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; स्थानिकांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने मोकळा केला मार्ग
Ratnagiri News
राजापूर : परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत मोरीची सफाई केली.
Published on
Updated on

राजापूर : राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावातील मठाजवळील मोरीच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. शनिवारी मोरी परिसरात झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन-चार वर्षांपासून मोरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडीमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अल्प पावसातही मोरीवरून पाणी वाहू लागून वाहतुकीला धोका निर्माण होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करून मोरीची उंची वाढविणे, गाळ काढणे, गटारे स्वच्छ करणे आणि झाडी हटविण्याची मागणी करण्यात आली होती.

राजापूर–ससाळे मार्गाच्या रुंदीकरणावेळीही ही समस्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गटारे व झाडी साफसफाईसाठी ठेका देण्यात आला असतानाही प्रत्यक्षात काम झाले नसल्याने संबंधित ठेकेदारालाही विभागाचे अभय असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अपघातानंतरही प्रशासनाकडून तातडीची कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते मंथन नवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने मोरीतील गाळ, भराव आणि झाडी हटवून पाण्याचा मार्ग मोकळा केला. प्रशासनाने करावयाचे काम ग्रामस्थांनी स्वतः करून दाखवल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, मोरीची तातडीने दुरुस्ती करून गाळ काढणे, मोरीची उंची वाढवणे, गटारे व झाडीची नियमित साफसफाई करणे, तसेच संबंधित निष्काळजी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news