Ratnagiri News : जयगड नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांचे धरणे

कामावर रुजू होताच ठेकेदाराने घरी पाठविल्याने संताप; वेतन, सुरक्षा आणि हक्कांसाठी जिल्हा परिषदेत ठिय्या
Ratnagiri News
जयगड नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांचे धरणे
Published on
Updated on

रत्‍नागिरी : जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेवरील कंत्राटी कामगारांनी प्रशासकीय दडपशाही आणि ठेकेदाराच्या कथित मनमानीविरोधात सोमवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सोमवारी कामावर हजर झालेल्या कामगारांना कंत्राटदाराने घरी पाठवून दिल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या १४ कामगारांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू करत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी कामगारांच्या प्रश्नांवर तीव्र भूमिका मांडली. प्रशासनाकडून प्रति कर्मचारी सुमारे १८ हजार ६०० रुपये मंजूर होत असताना कामगारांच्या हातात केवळ १० ते १२ हजार रुपयेच मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशांनंतरही ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि वेतन थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेचा उल्लेख करत, कामगारांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news