Ratnagiri News : तटरक्षक रडारवरून बंदी काळातील मासेमारीवर लक्ष!

लगतच्या मत्स्य कार्यालयांशीही रत्नागिरीतील पथकांमध्ये ठेवला जातोय समन्वय
Ratnagiri News
तटरक्षक रडारवरून बंदी काळातील मासेमारीवर लक्ष!
Published on
Updated on

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत बेकायदेशीरपणे यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी होऊ नये, यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय आणि तटरक्षक दलामध्ये समन्वय राखला जात आहे. तटरक्षक दलाचे रडार अशा अवैध मासेमारीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाची पाच पथकेही कार्यरत आहेत. त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाल्यापासून एकही कारवाई करण्याची वेळ आली नाही.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला असून ३१ जुलैपासून सुरू झालेली पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. या बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांच्या मासेमारीला बंदी आहे. मासळीचे प्रजनन होऊन या समुद्र संपत्तीत वाढ व्हावी, यासाठी पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे अशा धोकादायक वातावरणात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकेसह खलाशी, पागी यांच्याही जीवाला धोका असतो. परंतु सहायक मत्स्य विभागाची गस्ती नौकाही या बंदी कालावधीत बंद असते. ही संधी साधून काही नौका समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची शक्यता असते. गेल्या काही दिवसांपासून पाऊसही नसल्याने ही शक्यता अधिक होती. या पार्श्वभूमीवर सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून तटरक्षक दलाशी समन्वय साधण्यात आला आहे.

तटरक्षक दलाशी समन्वय ठेवताना शेजारच्या जिल्ह्यांतील मासेमारी नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारीसाठी येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मत्स्य व्यवसाय विभागाशीही परस्पर संपर्क ठेवला जात आहे. यातून कोणत्या जिल्ह्यातील नौका कुठल्या. जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत, याकडे लक्ष ठेऊन या माहितीचे परस्पर आदान-प्रदान करण्याचे नियोजन आहे. त्याचवेळी तटरक्षक दलाला विनंती करून समुद्रात कुठे अवैध मासेमारी सुरू असल्याचे दिसताच कळवण्याची विनंती करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाची पाच पथके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news