

साडवली : संगमेश्वर तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी भातशेतीच्या कामाला जोर धरला आहे. अशातच ताम्हाने पंचक्रोशीत गव्यांच्या वावरामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पंचक्रोशीतील नांदळज येथे मंगळवारी संध्याकाळी ६-४५ च्या सुमारास तेथील ग्रामस्थांना गव्यांचे दर्शन घडून आले.
४-५ गवेे गावातील रस्त्यावरून व भात शेतीजवळ दिसून आल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. भात शेतीची कामे सुरू झाली असून उत्तम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लावणीची कामे सुरु केली आहेत. मात्र गावात गव्यांचे दिवसा ढवळ्या दर्शन होत असल्याने शेतात जाणे अवघड झाले आहे. गेली तीन-चार वर्षांपासून ताम्हाने पंचक्रोशीत गव्यांचा वाढता वावर शेतकरी, ग्रामस्थ व प्रवासी वर्गासाठी चिंतेचा विषय बनला आहे.