Ratnagiri News : सुकिवली-सोनारवाडी फाट्यावर अंधारात कचरा टाकण्याचा प्रकार

हॉटेल व्यवसायातील कचऱ्यासह प्लास्टिक, लाद्या, फर्निचर व अन्य साहित्य; ग्रामस्थ त्रस्त
Ratnagiri News
सुकिवली-सोनारवाडी फाट्यावर अंधारात कचरा टाकण्याचा प्रकार
Published on
Updated on

खेड : तालुक्यातील सुकिवली गावातील सोनारवाडी फाटा येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी सडलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, हॉटेल व्यवसायातील कचरा, तुटलेल्या लाद्या, लाकडी फर्निचर तसेच इतर टाकाऊ साहित्य बेकायदेशीरपणे टाकले जात असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी अथवा पूर्वसूचना न घेता हा कचरा टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकला जात असल्याने संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सुकिवलीने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा प्रकार सुकिवली गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे तालुका खजिनदार विशाल सागवेकर यांनी निदर्शनास आणून दिला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई न केल्यास कचरा टाकण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news