

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला सलग पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे सोमवारी रात्रभर तसेच मंगळवारी पावसाने दमदार सर्वदूर हजेरी लावली. चोवीस तासात तब्बल ९५०.३८ मिमी पाऊस झाला आहे. नदी, धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दिवस-रात्र होत असलेल्या पावसामुळे खेड-भरणेपुल येथील जगबुडी नदीत सध्या ४.४० मीटर पाणी असून ही नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर आहे. येत्या दोनदिवसात पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास जगबुडी नदी धोकादायक पातळी ही ओलांढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाचे पुन्हा धो-धो बरसाला सुरूवात केली आहे. शहरासह तालुक्यात पावसाने अक्षरशा जिल्ह्याला झोडपून काढले आहे. दिवस-रात्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता कोकणातील जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचत आहे. वाहनधारकांना पाण्यातून वाट करून गाडी चालवावी लागत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दमदार पावसामुळे १८ पैकी तब्बल १३ टँकर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने बंद केल आहे. त्यामुळे सध्या तीन तालुक्यात केवळ ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्यापैकी पाणी टंचाई दूर झाली आहे. १ ते २९ जून दरम्यान ३ हजार ४०६ मिमी इतका पाऊस पडला आहे. तर गतवर्षी याच महिन्यात ८ हजार १७९ मिमी पाऊस झाला होता. शेतकऱ्यांकडून पेरणीला वेग आला असून आतापर्यंत ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही तालुक्यात भात लागवडीस प्रारंभ झाले आहे.
रत्नागिरीत सर्वाधिक १४३ मिमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासामध्ये सर्वाधिक रत्नागिरी शहर, तालुक्यात तब्बल १४३.७७ मिमी पाऊस पडला आहे. तसेच गुहागर १२७ मिमी, मंडणगड १२० मिमी, संगमेश्वर ११० मिमी, राजापूर १०६ मिमी, दापोली १०५ मिमी या सहा तालुक्यात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.