

रत्नागिरी : जिल्ह्यात कित्येक दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता; मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे विविध ठिकाणची पूर स्थिती नियंत्रणात आली आहे. दुसरीकडे दिवस-रात्र धडकी भरवणारा वादळी-वारा सुरूच आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला आठ ते दहा जुलैपर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बुधवारी जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली. काही तालुक्यात पावसाची रिपरिप झाल्याचे दिसून आले. खेड, चिपळूण, दापोली तालुक्यातील पूर स्थिती कमी होऊन हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. १० जुलैनंतर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुसळधार पावसामुळे लांजा, मंडणगड, गुहागर, चिपळूण, खेड या तालुक्यात विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज गेली आहे.
कोकणात पावसाने थोडी माघार घेतली असली तरी हलका पाऊस सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून हळूहळू या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातून पुणेला जाण्यासाठी चिपळूण-कराड मार्ग सोयीचा ठरत आहे. अनेकजण कुंभार्ली घाटमार्गे पुणेकडे मार्गस्थ होत आहेत.
महामार्गावर कशेडी घाटाजवळ अनुसया हॉटेल येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन महामार्ग ठप्प झाला होता. तब्बल १२ तासानंतर येथील दरड बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत करण्यात आली. कशेडी बोगदा, पोलदपूर, माणगाव यादरम्यानदेखील वाहतूक सुरळीत आहे. सुकेळी खिंड, वाकण, नागोठणे याठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर अतिवृष्टीमुळे पाणी आले होते. मात्र, आता येथील नद्यांचा पूर ओसरला असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. परशुराम घाट पार केल्यानंतर धामणदिवी येथे कोसळलेली दरडदेखील बाजूला हटविण्यात आली असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.