

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य केंद्रामार्फत मे, जून महिन्यातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दोन महिन्यात २ हजार ३५३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मे महिन्यात ३२, जून महिन्यात २६ अशा प्रकारे दोन महिन्यात ५८ पाणी दूषित असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. संगमेश्वर, खेड, गुहागर, चिपळुणातील पाणी सर्वाधिक दूषित आढळले आहे. तर लांजा, दापोली येथील पाणी नमुने दूषित नसून पिण्यायोग्य पाणी आढळले आहे.
परिणामी परिसरातील हातपंप, विहिरीचे पाणी पिणे अपायकारक आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील २९ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकही पाणी दूषित आढळले नाही. लांजा तालुक्यात मे, जून महिन्यात ३२८ पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकही पाणी नमुने दूषित आढळले नाही.
पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. या सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामपंचायतमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत पाण्याची तपासणी करण्यात आली. मे महिन्यात ९६१ पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यापैकी ३२ पाणी नमुने दूषित आढळले आहे. त्याचे प्रमाण ३.३३ टक्के इतका आहे. जून महिन्यात १ हजार ३९२ पाणी नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी २६ पाणी नमुन दूषित आढळले आहे. तर त्याचे प्रमाण १.८७ टक्के इतके आहे. दूषित पाणी नमुने आढळलेल्या तालुक्यातील हातपंप, विहिरीचे पाणी पिणे म्हणजे शरीराला अपायकारक, पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे नागरिकांनो सावधान दूषित पाणी पिल्यास धोक्याची घंटा आहे.