Ratnagiri News : शिरोडा-वेळागर समुद्रात गडहिंग्लजचा तरुण बुडाला

शिरोडा परिसरात हळहळ
Ratnagiri News : शिरोडा-वेळागर समुद्रात गडहिंग्लजचा तरुण बुडाला
Pudhari File photo
Published on
Updated on

मळगांव : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा- वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रणव देवमाने (वय २१, रा. गडहिंग्लज) असे समुद्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, त्याच्यासोबत असलेला दुसरा पर्यटक सुदैवाने पोहून पाण्याबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला आहे.

गडहिंग्लज येथून हे पर्यटक शिरोडा - वेळागर येथे फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोन्ही पर्यटक समुद्रात आंघोळीचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. यातील एका पर्यटकाने शर्थीचे प्रयत्न करत पोहून किनारा गाठला; मात्र प्रणव देवमाने हा पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आणि खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच शिरोडा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक जीवरक्षक आणि मच्छीमारांच्या मदतीने बुडालेल्या प्रणवचा समुद्रात कसून शोध घेण्यात येत आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. शिरोडा किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच शिरोडा-केरवाडी येथील राजन सारंग हे होडी पलटी होऊन समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुन्हा गडहिंग्लज येथील तरुण पर्यटकाचा बुडून अपघात झाल्याने शिरोडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news