

लांजा : भक्ष्याचा पाठलाग करताना सार्वजनिक खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. ही घटना रविवारी सकाळी ११.४० वाजता लांजा तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे घडली.
इसवली पाथरवाडी येथे लोकवस्तीत सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीत सकाळी ११.४० वाजता प्राण्यांचा ओरडण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागल्याने काही नागरिकांनी विहिरीमध्ये आत डोकावून पाहिले असता, विहिरीत एक बिबट्या पडलेला दिसला. या घटनेची माहिती इसवली पाथरवाडी गावचे ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी तत्काळ वन विभागाला दिली.
बिबट्या पडल्याची माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकार्यांना ही माहिती देऊन लांजा वन परिमंडळाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह इसवली येथे दाखल झाले. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी दोरीच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. तासाभरात बिबट्याला विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात यश आले. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय हे अंदाजे दीड वर्ष आहे. लांजा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास अनुसे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रत्नागिरी विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड, रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू करण्यात आले.