

देवरुख : सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेवर देवरुख ग्रामीण रुग्णालयातून तात्काळ उपचार न झाल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे या महिलेवर उपचार न झाल्याने ग्रामस्थांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. पोलिसांनी जमावाला शांत केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळये वाडी येथील अनुसया शिगवण वय वर्षे 85 या दुपारी 3.30 वाजता घराजवळील असलेल्या लाकडाच्या खोपीतून लाकडे काढत असताना विषारी सर्पाने त्यांच्या हातावर दंश केला. त्यांनी आरडाओरड करताच.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ 4 वा. 15 मिनिटांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर वेळी रुग्णालयात सेवेत असलेले डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे या महिलेवर उपचार होऊ शकले नाहीत. यावेळी ड्युटीला असलेले डॉक्टर भलत्याच कामात गर्क असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात होते. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
यावेळी डॉ. यादव रुग्णालयात दाखल झाले. हे डॉक्टर नुकतेच ड्युटी संपवून गेले होते. हे डॉक्टर परत आले व त्यांनी या महिलेची तपासणी सुरु केली तोपर्यंत वृद्ध महिला या गंभीर होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांनी रुग्णालयातच आरडाओरोड सुरू केला. ही घटना कळताच उपनिरीक्षक जाधव व सहकारी पोलिसांसह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. उपस्थित डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी केली.
रुग्णालयात यापुढे 24 तास डॉक्टर असलेच पाहिजेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली. यावर उपस्थित डॉ. यादव यांनी यापुढे सेवेत सदैव डॉक्टर उपस्थित राहतील. अशी कोणती पुन्हा घटना घडणार नाही अशी ग्वाही दिली. यानंतर सायंकाळी उशिरा सदर महिलेचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.