

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काही तालुके वगळता इतर तालुक्यात म्हणावा तितका पाऊस झाला नाही. त्यामुळे पहिल्या ट्रीगरमध्ये तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात ८५ हजार ७१० मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, चारा आणि पाण्याची मुबलकता असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात लहान-मोठी मिळून सुमारे १ लाख ९६ हजार जनावरे आहेत.
एकीकडे राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ तालुक्यात अधिकारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे हाल होऊ नये म्हणून राज्यासह जिल्ह्यात जनावरांना चारा, पाणी उपलब्ध करून ठेवा, प्रसंगी चारा छावणी करा, अशा सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग, खरीप हंगामातील पिके आणि चारा पिकांच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा उपलब्ध होत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे चारा उपलब्धतेत भर पडण्यास मदत झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांच्या चारा-पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, चारा उत्पादनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) अतिरिक्त ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, या निधीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. निधी मंजूर झाल्यास चारा बियाणे वाटपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक मदत करता येणार आहे.