Ratnagiri News : धामणी ग्रामपंचायतीत दिव्यांगांच्या व्हीलचेअर धूळ खात

कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित; महापुरात खुर्च्या बुडाल्याने मोठ्या प्रमाणात झाली हानी
Ratnagiri News
धामणी ग्रामपंचायतीत दिव्यांगांच्या व्हीलचेअर धूळ खात
Published on
Updated on

देवरुख : धामणी ग्रामपंचायत इमारतीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी आणण्यात आलेल्या व्हीलचेअर गेली दोन वर्षे धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत आलेल्या महापुराच्या पाण्यात या खुर्च्या बुडाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. दिव्यांगांच्या सुविधांकडे झालेल्या या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

नुकत्याच तुरळ ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रभाग समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला. लोकसभा निवडणुकीसाठी आणलेल्या या व्हीलचेअर निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर दिव्यांगांच्या वापरासाठी देण्यात का आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील पार पडल्या; मात्र या खुर्च्या अद्यापही ग्रामपंचायत इमारतीत पडूनच असल्याचे समोर आले.

सलग दोन वर्षे महापुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे या व्हीलचेअरची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दिव्यांगांच्या सुविधांसाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या साहित्याची अशी दुर्दशा झाल्याने दिव्यांगांची थट्टा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या व्हीलचेअरची जबाबदारी नेमकी कोणाची, गटविकास अधिकारी कार्यालयाची की निवडणूक विभागाची, यावर बैठकीत जोरदार चर्चा झाली. तसेच संबंधित प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि दिव्यांगांसाठीच्या सुविधांची योग्यप्रकारे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news