Ratnagiri News : ऐन पावसात चिपळूण-गुहागर मार्गावर झाडे-झुडपांची साफसफाई

रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे अपघातांचे वाढले होते प्रमाण
Ratnagiri News
ऐन पावसात चिपळूण-गुहागर मार्गावर झाडे-झुडपांची साफसफाई
Published on
Updated on

चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता. अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने पावसाच्या मुहूर्तावर गुहागर मार्गावरील झाडे झुडपे व साईडपट्टी साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. जेसीबीच्या साह्याने हे काम सुरू आहे. मात्र, गेले वर्षभर अनेक वेळा मागणी होऊनदेखील त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते.

नागरिकांकडून वारंवार होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, सदस्या सायली वाजे व सुप्रिया वंजारे यांनी हा प्रश्न पंचायत समितीच्या सभांमध्ये उपस्थित केला होता. अखेर प्रशासनाने दखल घेत रस्त्यांच्या झाडी-झुडपे हटविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मागील सभेत सदस्यांनी संबंधित काम झाले नाही तर रास्ता रोकोचा इशाराही दिला होता. या इशार्‍यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली व ठेकेदारातर्फे हे काम सुरू केले आहे.

वाढलेल्या झाडीमुळे वळणाच्या ठिकाणी समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात वाढले होते. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत गौरव पाटेकर यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सायली वाजे व सुप्रिया वंजारे यांनीही पाठिंबा दिला.

सदस्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतची झाडी साफ करण्याचे काम सुरू केले आहे. या कामामुळे वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील रस्त्याला साईड पट्टी नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाने गुहागर मार्गावरील साईडपट्टी सुस्थितीत करावी म्हणजे वाहनांची ये-जा सुरक्षित पद्धतीने होऊ शकेल, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news