

चिपळूण : सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी गुहागर-विजापूर मार्गावर करोडो रुपयांची उधळण करूनही जर रस्त्यावर खड्डेच तर हे पैसे गेले कुठे?... निधी लाटून झाला असेल आणि खड्डे भरायला जर निधी नसेल तर भीक मागून पैसे देऊ... आठ दिवसांत जर खड्डे भरले नाहीत तर शेकडो कार्यकर्ते २० जुलै रोजी भीक मागो आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बांधण्याचा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला
राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणारा गुहागर-विजापूर मार्गावर बहादूरशेख ते कुंभार्ली घाट रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे व जागोजागी काँक्रटची कोसळणारी गटारे, त्यातून तुंबणारे पाणी याने रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. तर या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडून करोडो रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या संदर्भात मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाधक्ष राजू खेतले यासह मनसैनिक पप्पू आंब्रे, गणेश खेडेकर, मिलिंद कदम, राजेंद्र गोंजारी, आबा हटकर, विनोद चिपळूणकर, मंगेश महाडिक, उमेश पवार, सुनील मोडक, चांद शहा, मुस्ताकिन चांद शहा, सुलेआम शेख भाई सुर्वे आदींसह कार्यकर्त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना जाब विचारला.
बहादूरशेख ते पिंपळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात होता तर त्यापुढे कुंभार्ली घाटापर्यंतचा रस्ता ६ महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. यावर दोन्ही विभागाने करोडोंचा निधी खर्च केला आहे. या संदर्भात राजू खेतले यांनी उपअभियंता यांना जाब विचारला.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर मनसेचे वाहतूक जिल्हाधक्ष राजू खेतले यांनी आम्हांला निधीचा हिशेब नको व काही नको ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात पाठवलेले पत्रही दाखवू नका. आम्हाला यात कोणताही रस नाही. आम्हाला रस्ता सुस्थितीत पाहिजे आहे. जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत बाजूची साफसफाई केली जात आहे ती करू देणार नाही. अगोदर खड्डे भरा नंतर ही कामे करा, ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी कामे काढून रस्त्याची वाट लावू नका. सोमवारपर्यंत या मार्गावर असणारे खड्डे बुजवा, अन्यथा येत्या २० जुलै रोजी शहर व ग्रामीण भागात मनसैनिक भीक मागो आंदोलन करून निधीचे गाठोडे गळ्यात बांधू, असा इशारा राजू खेतले यांनी सबंधित अधिकार्यांना दिला.