

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आरवली-करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र संपणार कधी? असा प्रश्न प्रवासीवर्गासह वाहनधारक चालकाकडून विचारला जात आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिकच सुरू आहे.
आरवली-करजुवे या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्याच्या दुतर्फा नाले सफाई झालेली नाही व वाढलेली झाडी तोडली जात नसल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी रस्त्यावरून वाहत गेल्याने रस्ता उखडून खड्डे पडत आहेत. सद्या पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असून रस्यावरच पाणी वहात आहे. सरंद ते माखजन बस स्टॅन्डपर्यंत सलगपणे खड्डे पडले आहेत. तसेच हुजरे यांच्या घरासमोरील मार्गावर पडलेल्या खड्ड्यात पडून माखजन येथील दुचाकीवरील तरुणाच्या खांद्याला जबर दुखापत झाली आहे. तसेच याचठिकाणी अनेक दुचाकीस्वार पडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसात ठेकेदाराकडून करजुवे मार्गांवर खड्डे भरण्यास सुरवात केली होती. मात्र आज दहा दिवस उलटले तरी ठेकेदार किंवा खड्डे भरणारे कामगार आजही इकडे फिरकलेच नसल्याने ग्रामस्थ, वाहन धारक व प्रवासी वर्गाकडून असंतोष व्यक्त केला जात आहे. या मार्गाची दुरवस्था समजून घेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासीवर्गाकडून होत आहे.