

विनोद पवार
मंडणगड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेल्या आंबडवेच्या विकास आराखड्यानुसार राज्य शासन या गावाच्या विकासास गती देईल, अशी घोषणा केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम या गावाच्या विकासाकरिता आग्रही असून ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. या सर्वांच्या प्रयत्नाने आंबडवे गावाचा भविष्यकाळ निश्चितपणे उज्ज्वल बनेल, असा विश्वास तालुकावासीयांना आहे.
संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे हे मूळ गाव नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. बाबासाहेबांच्या या मूळगावास सत्ताधार्यांनी, आमदार, खासदार, मंत्री राज्यमंत्री, वरिष्ठ स्तरावरील अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी दिल्या व या गावाचे महत्त्व समजून घेत भूतकाळात केवळ घोषणा केल्या आहेत. अगदी देशस्तरावर आदर्श ठरलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातूनही गावाच्या पदरी ठोस व शाश्वत म्हणावे, असे काहीही लागलेले नाही. त्यामुळे वेळोवेळी होणार्या विकासाच्या घोषणा या केवळ राजकीय ठरल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची केवळ निराशा झाली आहे.
मात्र मंडणगडच्या न्यायालयाच्या बाबतीत, घटनाकारांच्या तालुक्यात न्यायालय नाही, ही बाब तशी कोणालाच रुचणारी नव्हती. राज्य सरकारचे न्यायालायाच्या स्थापनेपासून ते न्यायालयाच्या भव्य, देखण्या इमारतीच्या निर्माणापर्यंतचे प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या मूळ गावाचे राज्यशासनाच्या माध्यमातून विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे. राज्य सरकारने या बाबतीत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत सरकार व यंत्रणेला या ठिकाणाचे महत्त्व ठळकपणे माहिती असताना घेतलेली भूमिका अनाकलनीय अशीच राहिली. विशेष बाब म्हणून शासनाने निधीची उपलब्धता करणेही तितकेच आवश्यक आहे.
भूतकाळात आंबडवे जगाच्या नकाश्यावर येईल, अशा प्रकारे विकसित करण्याची राज्यकर्त्यांची महत्त्वाकांशा केवळ चर्चा, बैठका आणि घोषणा यावरच थांबली. आदर्श संसद ग्राम योजनेतून येथील विकासाचे प्रयत्न झाले आहेत. त्या माध्यमातून थोडा बहुत विकास झालाही, मात्र ठोस व आश्वासक असा विकास साधला गेला नाही.
आंबडवेत चांगला सर्वांगीण विकास साधायचा यावर तर सर्वांचेच सकारात्मक मत आहे. वेळोवेळीच्या सर्वच राज्यकर्त्यांची येथील विकासाबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे, पण त्याकरिता आवश्यक ती कृती मात्र दिसली नाही. आंबडवेचा विकास झाल्यास तालुक्याच्या किंबहुना कोकणच्या भविष्यातील विकासाच्या वाटचालीत आंबडवे गाव हे महत्त्वाची भूमिका बजावेल. आता येथील लोक राज्यकर्त्यांकडून विकासाबाबतीत आशावादी आहेत.