

रत्नागिरी : जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील काही भागांत दुर्गंधीमुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर उबाठा शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयावर जोरदार धडक देत येत्या आठ दिवसांत यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रुग्णालयाचे डिन डॉ. रामानंद यांना देण्यात आला. यावेळी उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगरसेवक नितीन तळेकर, सलील डाफळे उपस्थित होते.
एक्स रे फिल्मचा तुटवडा
रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून एक्स रे फिल्मचा तुटवडा जाणवत असून, एक्स रे रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर देण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकदा योग्य निदान होत नसल्याचा आरोप उबाठाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचे एक्स रे बाहेरुन काढून घ्यावे लागतात, त्यासाठी सहाशे ते हजार रुपयांना रुग्णांना नाहक खर्च करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात एक्स रे फिल्मचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
टॉयलेटची दुरवस्था
रुग्णालयातील काही टॉयलेटची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी प्रचंड दुर्गंधी असून रुग्णांचे व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचे काम करणार्या कंपनीकडून मात्र दिवसातून तीन वेळा टॉयलेट साफ केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही टॉयलेटमध्ये दुरुस्तीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. यावरही लवकर तोडगा काढण्याची मागणी साळुंखे यांनी केली.
बेशिस्त वाहने पार्कींग
रुग्णालयात वाहने पार्कींग करण्याबाबत शिस्त नाही. वाहने कोणीही कशीही उभी करीत असतो. त्यामुळे रुग्णवाहिकांना येण्याजाण्यात अडथळे निर्माण होत असल्याची बाबही उबाठाच्या पदाधिकार्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
रुग्णांच्या नातेवाईंकांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आला असून, तो नातेवाईंकासाठी खुला करण्यात आलेला नाही. याठिकाणी लक्ष ठेवण्यास सुरक्षा रक्षक नसल्याने तो बंद असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक विभागाकडे सुरक्षा रक्षकांची मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.