Ratnagiri News : अबब...जिल्‍ह्यात ७३९ शाळांत केवळ एकच शिक्षक!

रिक्‍त पदे, पटसंख्येअभावी जिल्‍ह्यातील शाळांना घरघर; यापूर्वी ३५ शाळा झाल्‍या होत्‍या शून्‍य शिक्षकी
teacher recruitment
teacher recruitmentfile photo
Published on
Updated on

रत्‍नागिरी : पटसंख्येअभावी जिल्‍ह्यासह राज्‍यातील एक शिक्षकी शाळांचे प्रमाण वाढत आहे. काही शाळा वाचवण्यात यश आले तर काही शाळा पटसंख्येअभावी किंवा शिक्षकाअभावी बंद होत आहेत. दरम्‍यान, राज्‍यात एकूण ९ हजार २७४ एक शिक्षकी शाळा असून त्‍यामध्ये रत्‍नागिरी जिल्‍हा ७३९ एकशिक्षकी शाळांसह राज्‍यात अव्‍वल ठरला आहे. एका वर्षात राज्‍यात अशा शाळांची संख्या १,१२२ ने वाढल्‍याने शिक्षण वर्तुळात, ग्रामीण भागात खळबळ उडाली असून चिंता व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात शहराऐवजी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. या शाळा डोंगराळ भागासह दुर्गम भागात आहेत. प्राथमिकच्‍या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्‍या तर काही शाळा वाचवण्यात यश आले. तर काही शाळा पटसंख्या कमी असली तरी कोकणाला नियम बदलून शाळा सुरू ठेवल्‍या आहेत. मात्र शाळांमध्ये शिक्षकांची रिक्‍त पदे न भरल्‍याने अनेक ठिकाणी संपूर्ण शाळेचा कारभार केवळ एका शिक्षकावर सुरू आहे. एकाच शिक्षकाला पहिली ते चौथी किंवा काही ठिकाणी यापुढील वर्गांचे अध्यापन, विद्यार्थ्यांचे नोंद, शालेय पोषण आहार, विविध शासकीय सर्वेक्षणे, निवडणूक कामे, कार्यालयीन, शालेय कामे करावी लागत आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांचा चांगले शिक्षण देणे कठीण झाले आहे.

यापूर्वीही जिल्‍ह्यात २६३ शिक्षक अतिरिक्‍त ठरत असल्‍याचे तर ९९ शाळा शून्‍य शिक्षक होणार होते. यापैकी ६१ शाळा वाचवण्यात यश आले आहे. त्‍यानंतर आता जिल्‍ह्यातील ७३९ शाळा एक शिक्षकी आहेत. त्‍यापैकी माध्यमिकच्‍या ३ शाळांचा समावेश आहे. त्‍यामुळे एक शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. टीईटीतून नव्‍या शिक्षकांची नेमणूक झाल्‍यास खऱ्या अर्थाने हा प्रश्न मिटणार आहे. अन्यथा जिल्‍ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान तर होणार तसेच गुणवत्ता कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पटसंख्येअभावी शिक्षकांची पदे रिक्‍त असल्‍यामुळे एक शिक्षकी शाळा होत आहेत. जिल्‍ह्यात एकूण किती शाळा एक शिक्षकी आहेत, याची माहिती घ्यावी लागेल. बऱ्याच शाळेत शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. टीईटीतून नव्‍या शिक्षकांची नेमणूक झाल्‍यास खऱ्या अर्थाने शिक्षकांचा प्रश्न मिटेल.
- सुनिता शिरभाते, प्रभारी शिक्षणाधिकारी, जि.प. रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news