

रत्नागिरी ः शनिवारी सायंकाळी शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोत अर्भक टाकून गेलेल्या माता-पित्यांचा शहर पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. पुरुष जातीचे हे अर्भक सापडल्यानंतर शहर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानपथक तेथील झोपडपट्टीतून कानोसा घेत मुख्य रस्त्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी घुटमळत राहिले. त्यामुळे या अर्भकाला त्या ठिकाणी आणण्यासाठी एखाद्या वाहनाचा वापर करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेल्या त्या अर्भकाची तब्येत उत्तम असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात त्या अर्भकाला कचरा डेपोत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.