

दापोलीत नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील मुरुड, कर्दे, लाडघर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे आणि केळशी आदी बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्या ठिकाणी असणार्या सोयीसुविधांचा पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसले.
नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी महिनाभर अगोदरच बुकिंग करून ठेवले होते. तालुक्यातील सर्वच किनार्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. दापोली ते केळशीच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसली. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.
दापोली भेटीवर येणारे पर्यटक मासळी खाल्ल्याशिवाय जात नाहीत. लज्जतदार तिखट झणझणीत अशा चवीच्या अनेक प्रकारच्या डिशेस येथील सर्वच रिसॉर्ट व घरगुती ठिकाणी मिळतात. पर्यटकांनी मनसोक्तपणे यावर ताव मारला. मुरुड बीचवर उंट सफर, संध्याकाळच्या वेळेस सुर्यास्त आणि समोर समुद्रात पॅरासिलिंगची मज्जा, घोडागाडीत बसून संपूर्ण किनारपट्टीची सफर असा आनंद अनेक पर्यटकांनी घेतला.
सॅन्ड बाईक, तसेच सॅन्ड थ्रीव्हीलरवरून किनारपट्टीवर सफर करताना स्वतः स्टेअरिंग हातात घेऊन पर्यटक आनंद घेत होते. काही पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेताना दिसले. लहान मुले वाळूमध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद घेत होते.