

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला असतानाच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामचुकार ठेकेदार कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामात कमालीची दिरंगाई करणाऱ्या कंपन्यांवर तब्बल २० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची धडक कारवाई प्राधिकरणाने सुरू केली असून, या दणक्यामुळे महामार्गावरील ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा चिपळूण येथील उड्डाणपुलावरील गर्डर १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कोसळला. या दुर्घटनेनंतर पुलाचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे 'ईगल कन्स्ट्रक्शन' कंपनीला मे २०२४ मध्ये नवीन आराखडा सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र त्यानंतरही या कंपनीने कामात तब्बल चार महिन्यांचा विलंब केला. प्रशासनाने या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत ईगल कन्स्ट्रक्शनला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
केवळ एकच टप्पा नव्हे, तर आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड आणि चिपळूण पूल अशा विविध टप्प्यांतील रखडलेल्या कामांमुळे महामार्गाचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे. या सर्व कामांमधील विलंबापोटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकत्रितपणे २० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. हुजूर मल्टिप्रायव्हेट आणि ईगल कन्स्ट्रक्शन यांसारख्या ठेकेदार कंपन्या सध्या प्राधिकरणाच्या रडारवर आहेत.
५९२ कोटींच्या कामातही दिरंगाई
आरवली ते कांटे या ३९ किलोमीटर टप्प्यातील ५९२ कोटी रुपयांच्या कामातही मोठी दिरंगाई झाली आहे. या कामाची अंतिम मुदत जून २०२६ पर्यंत होती; परंतु मुदत संपूनही काम पूर्णत्वास न गेल्याने मुख्य ठेकेदार असलेल्या 'हुजूर मल्टिप्रायव्हेट लिमिटेड' कंपनीला दररोज सहा लाख रुपये याप्रमाणे दंड आकारला जात आहे. विलंबाचे दिवस पाहता या कंपनीला सुमारे आठ कोटी रुपयांचा दंड बसण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, या टप्प्याचे काम सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून म्हात्रे कंपनीकडे होते.