

राजापूर : यापूर्वी जनतेच्या प्रखर विरोधामुळे रद्द करण्यात आलेली राजापूर तालुक्यातील नाणार, परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या पर्यावरणीय विषयावरील जनसुनावणीची तारीख आता सोमवार दिनांक ७ सप्टेंबर २०२६ ला श्री कात्रदेवी मंगल कार्यालय येथे दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे बॉक्साईट प्रकल्पावरून पुन्हा एकदा नाणार परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता असून, सुनावणीत स्थानिक ग्रामस्थांकडून कोणती भूमिका मांडली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नाणार परिसरातील सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननाचा प्रस्ताव असून, प्रस्तावित उत्पादन क्षमता ०.९ दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण, पाण्याचे नैसर्गिक स्रोत, शेती तसेच आंबा बागायतीवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वीही बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीवरून राजापूर तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजापूर पंचायत समितीच्या सभेतही प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला विरोध दर्शवून पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा ठराव करण्यात आला होता.
दरम्यान, नाणार परिसरात यापूर्वी रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोठा संघर्ष उभा राहिला होता. आता बॉक्साईट उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरच्या जनसुनावणीत ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि संबंधित घटकांकडून कोणते आक्षेप व सूचना मांडल्या जातात, तसेच प्रशासन त्याची कशी दखल घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष
तालुक्यातील श्री कात्रादेवी मंगल कार्यालय, मु. पो. सागवे (घोडपोई )श्री कात्रादेवी जत्रेचे ठिकाण येथे सोमवारी दिनांक ७ सप्टेंबर ला दुपारी बारा वाजता ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
नाणार बॉक्साईट उत्खननाचा विषय केवळ नाणार गावापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम लगतच्या गावांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची भूमिका, प्रशासनाची तयारी आणि प्रकल्प समर्थक-विरोधकांची भूमिका यामुळे नाणार परिसरात पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण निर्माण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाच्या वतीने सुनावणी आयोजित करण्यात आल्याने नाणार, सागवे परिसरात जोरदार संताप निर्माण झाला असून कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला संघटित होऊन विरोध करायचाच असा निर्धार स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.