

रत्नागिरी : महसूल विभागाने सुरू केलेला ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम हा केवळ 15 दिवसांपुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण वर्षभर ‘नमो सेवा वर्ष’ म्हणून साजरा करावा. 15 दिवसांच्या काळात अधिकारी स्वतःचा नंबर पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, पण जर नागरिकांना 365 दिवस सुखी ठेवले, तर खर्या अर्थाने शासनाला अपेक्षित काम होईल आणि महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श निर्माण होईल. जेव्हा एखादा नागरिक काम घेऊन येतो, तेव्हा त्याचे काम झाले नाही तरी चालेल, पण त्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.काम न करणार्यांनी मात्र गय नसल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणून सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच महसुल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. सामंत म्हणाले, जिल्ह्याच्यावतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. महसूल विभागाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे की घर देण्यापासून ते एखाद्याला तडीपार करण्यापर्यंतचे सर्व अधिकार महसूल विभागाकडे आहेत आणि यामुळेच अनेक लोक या विभागाला घाबरतात. जमिनींची मोजणी, घरांची नोंदणी, आणि इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी महसूल विभागाची गरज असते. या विभागाला महाराष्ट्रात आणि देशात जेवढे अधिकार आहेत, तेवढे इतर कोणत्याही विभागाला नाहीत, असे त्यांचे मत आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रम केवळ 15 दिवसांपुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण वर्षभर नमो सेवा वर्ष म्हणून साजरा करावा. रत्नागिरी जिल्ह्याचा आदर्श आम्ही का दाखवतो तर जिथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि आधुनिक प्रशासकीय इमारत तयार होत आहे, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इमारतीही उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. प्रशासनाचे काम केवळ इमारती उभ्या करणे नसून, लोकांबरोबर प्रेमाने आणि आदराने वागणे हे देखील आहे. जेव्हा एखादा नागरिक काम घेऊन येतो, तेव्हा त्याचे काम झाले नाही तरी चालेल, पण त्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. यामुळे तक्रारी निर्माण होणार नाहीत.
एखाद्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्याने त्यांचा विश्वास वाढतो. भले निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही, तरीही चालेल. परंतु त्याला समाधान मिळते की, आपले म्हणणे ऐकून घेतले. हेच तत्त्व प्रशासनानेही पाळले पाहिजे. प्रशासनाने नेहमीच चांगल्या पद्धतीने काम केले आहे, असे ते म्हणाले. रत्नागिरीत येणार्या नवीन प्रकल्पांबद्दल बोलताना ना. सामंत म्हणाले, जिल्ह्यात येणार्या प्रकल्पांबाबत प्रशासनाने लोकांना समजावून सांगितले पाहिजे की हे प्रकल्प बेरोजगारी दूर करण्यासाठी हजारो लोकांना रोजगार देणार आहेत. लोकांनी मानसिकता बदलत येणार्या प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे.