

खेड : दापोली तालुक्यात दि. 29 मार्च 2022 रोजी आरोपी मधुकर धोंडू सणस (62 वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात सुनेला ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास खेड येथील जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. चांदगुडे दिनांक 28 रोजी जन्मठेप व 5 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
मधुकर धोंडू सणस ( वय 62 वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) व त्याची सून आरती अभिषेक सणस, (वय-32 वर्षे, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी, ता. दापोली) हे एकत्र राहत होते. सुनेवर घरगुती कारणावरून मधुकर याचा राग होता. त्यामुळे अनेकदा त्याच्यात वाद होत. आरती सणस ही आशा सेविका म्हणून कोव्हिड काळात काम करीत होती. याचा सासरे मधुकर सणस यास राग होता. दि.29 मार्च 2022 रोजी दुपारी 1 चे सुमारास यातील सासरा मधुकर सणस यांनी घरात असणारी सुरी घेऊन तिला धार काढून त्या सुरीने सून आरती सणस हिच्या पाठीमागून हल्ला केला. त्या हल्ल्यात सून आरती हिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मधुकर सणस याचेविरुध्द दापोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आला. त्याच्या विरोध खेड येथील न्यायालयात खटला चालवण्यात आला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासणेत आले. सदरकामी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, शवविच्छेदन अहवाल या सर्व गोष्टीचा विचार करुन आरोपींच्या विरुध्द गुन्हा सिद्ध झाला. सरकारी वकील ॲड. मृणाल जाडकर यांनी युक्तिवाद केला. खटल्याच्या कामकाजात तपासिक अंमलदार पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, कोर्ट पैरवी पोलिस हवालदार सुदर्शन गायकवाड, महिला पोलिस शिपाई श्रीमती कासार यांचे सहकार्य लाभले.