

चिपळूण शहर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी महायुती करावी की, स्वबळावर लढावे याबाबत चर्चा व निर्णयासाठी भाजपच्या कोकण विभागातील प्रमुख आणि खास पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिराने झाली. यावेळी प्रामुख्याने कोकणातील नगरपालिका, नगरपंचायती निवडणुका कशा पद्धतीने लढवाव्यात, या खास बैठकीत चर्चा झाल्याची माहिती भाजपच्या खास गोटातून मिळत आहे.
चिपळूण नगरपालिकेतील राजकारणाचे परिणाम व पडसाद कोकणातील राजकारणावर उमटत असल्याने न.प.ची सत्ता व वर्चस्व स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाचा राजकीय नेता व पक्ष ताकद दाखवून देत असतो. त्यातच आता मुुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सूतोवाच केल्यामुळे त्याचा फायदा घेऊन या निवडणुका प्रामुख्याने चिपळूण न.प.ची निवडणूक स्वबळावर लढवण्याची शक्यता भाजप वर्तुळातून व्यक्त होत आहे. चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या पुरुष गटात जाहीर झाल्याने सवर्र्च पक्षांकडून पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे चिपळूण न.प.वर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपदेखील पुढे सरसावला आहे. भाजपकडून या महत्त्वाच्या बैठकीला खास प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रदेशकडून बोलावण्यात आले. चिपळूण भाजपमधील खास प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी सायंकाळपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीसाठी कोकणातील सुमारे दीडशे खास प्रमुख पदाधिकारी व नेते उपस्थित होते. चिपळूणमधून आठ ते दहाजण उपस्थित होते. न.प. निवडणूक चर्चेनुसार भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी संधी मिळण्याचे संकेत दिल्याची माहिती भाजप वर्तुळातून देण्यात आले आहेत.
शनिवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या या खास बैठकीला चिपळुणातून काही ठराविक महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित केल्याचे सांगितले जाते; मात्र शहरातील पक्षाच्या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदांवर असलेल्या व पक्षात विशेष काम करणार्या काही पदाधिकार्यांना या बैठकीच्या निमंत्रणापासून डावलल्याची उद्विग्न भावना भाजप वर्तुळात व्यक्त होत आहे. या बैठकीतील काही महत्त्वाची माहिती विरोधकांपर्यंत पोहोचू नये यासाठी या बैठकीच्या आयोजनात खास विश्वासूंना बोलाविले असल्याची चर्चा भाजप गोटात सुरू आहे.