Ratnagiri News : सफाई कामगारांवरुन सेना-भाजपात नाराजीनाट्य

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कामगारांना दमदाटी होत असल्याच्या तक्रारी
Ratnagiri Municipal Council
रत्नागिरी नगर परिषद
Published on
Updated on

रत्नागिरी : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे रत्नागिरी पालिकेतील सफाई कामगारांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मी सांगेन त्या प्रभागातच सफाईसाठी जायचे, असा दम सेना पदाधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांना भरल्याने शिवसेना आणि भाजप सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आता नाराजी नाट्य रंगू लागले आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वादात सफाई कर्मचाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत.

रत्नागिरी पालिकेवर शिवसेना आणि भाजपा महायुतीची निर्विवाद सत्ता आहे. सत्तेत बसल्यापासूनच पालिकेतील विविध कारभाराचे किस्से बाहेर येऊ लागले आहेत. यापूर्वी शौचालय घोटाळा बाहेर आला, त्यानंतर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात वाद झाल्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला. प्लास्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी देण्यात आलेले कापडी पिशव्यांचे मशिन सार्वजनिक ठिकाणी न बसवता चक्का शौचालयात बसवण्याचा अजब कारभार पुढे आला. त्यानंतर मंजूरी पुर्वीच विकास कामे पुर्ण केल्याची तक्रार माजी नगराध्यक्षांनी केली. पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने 2 महिने सफाई कर्मचाऱ्यांचा पगार नाही. त्यांची मनधरणी करून आश्वासन देऊन शहरातील सफाईचे काम सुरू आहे. अशी परिस्थिती असताना आता वेगळाच प्रकार पुढे आला आहे. पालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकांपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीच दादागिरी वाढली आहे. याबाबत थेट भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे तक्रार केली आहे. पडलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रभागात सफाई कर्मचारी पाठववले जातात. मग आम्ही मागणी करुन सुद्धा आमच्या प्रभागात का दिले जात नाहीत. याबाबत संबंधित महिला नगरसेविका थेट नगराध्यक्षांना भेटल्या. तेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मुकादमांना बोलावण्यात आले.

मी सांगेन त्या प्रभागातच सफाईसाठी जायचे, अशी तंबी शिवसेना पदाधिकाऱ्यांने आम्हाला दिल्याचे सफाई कर्मचाऱ्यांने सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सफाई कर्मचारी पाठवले, असे त्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांच्या पुढे स्पष्ट केले. नगरसेवक आणि सेना पदाधिकारी यांच्या वादामुळे आता सफाई कर्मचाऱ्याचे हाल होत आहेत. याला कंटाळून सफाई कर्मचारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट भाषेत सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय वाटप समान करा. बाकी कोणाचे ऐकण्याची गरज नाही. शिवसेना गट नेते बाळू साळवी यांनीही ते स्पष्ट करत जर अशी कोण तंबी देत असले तर लेखी स्वरूपात द्या, असे सांगून यावर तोडगा काढण्यात आला. नगराध्यक्षा सांगतील त्याप्रमाणे काम करा अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news