Ratnagiri | स्वच्छतेत रत्नागिरी किनारपट्टी देशात तिसरी!

शहरांमधून रत्‍नागिरी नगरपरिषदेची बाजी; राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार
नवी दिल्‍ली : राष्‍ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार स्‍वीकारताना नगराध्‍यक्षा शिल्‍पा सुर्वे, मुख्‍याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्‍यक्ष समीर तिवरेकर, पाणी समिती सभापती निमेश नायर आदी.
नवी दिल्‍ली : राष्‍ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार स्‍वीकारताना नगराध्‍यक्षा शिल्‍पा सुर्वे, मुख्‍याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्‍यक्ष समीर तिवरेकर, पाणी समिती सभापती निमेश नायर आदी.
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील किनारपट्टीवरच्‍या सर्व शहरांमधून रत्नागिरीने मिळवलेले हे यश शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे.

किनारपट्टीवरील शहरांची स्वच्छतेच्या निकषांवर श्रेणी ठरविण्यासाठी शासननियुक्त समितीने गेल्या एप्रिल-मे महिन्यांत सर्वेक्षण केले होते. यामध्ये प्रभागनिहाय स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, सार्वजनिक शौचालये आणि उद्यानांची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषदेने तिसरे स्थान मिळवले. गेल्या काही महिन्यांत नगराध्यक्षांसह पदाधिकारी आणि नगरसेवकांची निवड झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेच्या कामांचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात सफाई कामगार नेमून त्यांच्या सूचनेनुसार स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली. या नियोजनाचा सकारात्मक परिणाम स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालातून दिसून आल्याचे नगराध्यक्षा सुर्वे यांनी सांगितले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्‍याधिकारी वैभव गारवे, स्वच्छता समिती सभापती राकेश ऊर्फ राकेश नागवेकर, पाणी समिती सभापती निमेश नायर, उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे आणि नगर अभियंता यतिराज जाधव उपस्थित होते.

अधिकारी- कर्मचार्‍यांमुळे यश

रत्नागिरी नगरपरिषदेला यापूर्वीही स्वच्छतेतील थ्री स्टार मानांकन, हागणदारीमुक्त शहर आणि स्वच्छतेशी संबंधित विविध पुरस्कार मिळाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांचे सहकार्य तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादामुळे हे यश मिळाल्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.